आदित्य ठाकरे यांनी (Aaditya Thackeray) टाटांचा प्रकल्प बाहेर कसा गेला? तारीख कोणती होती? हे बारकाईनं पाहिलं तर २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळेला मुख्यमंत्री त्यांचे वडील होते. जे बोलतायेत ते कॅबिनेट मंत्री होते. मग या प्रकल्पात काही देवाणघेवाण झाली नाही म्हणून हा प्रकल्प राज्याबाहेर गेला? अशी शंका लोकांमध्ये आहे. छोटा पप्पू पहिले बोलले असते तर आज ही वेळ आली नसती असं सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. छोटा पप्पू म्हणत सत्तारांनी आदित्य ठाकरेंना चिडवलं होतं. य़ानंतर आता भाजपाने देखील आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांनी देखील आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणणे हा पप्पू शब्दाचा अपमान करण्यासारखे आहे असा टोला लगावला आहे. "पप्पू म्हणणं योग्य नाही आणि आदित्य ठाकरे साहेबांना तर नाहीच नाही. कारण त्यांच्या इतकं हुशार... एका बाजुला पर्यावरणाचं प्ले कार्ड हातात घेऊन आरेत उभे राहिले. दापोलीला समुद्र किनाऱ्यावर त्यांचे संयोगी मंत्री अनिल परब यांचँ फाईव्ह स्टार 50 कोटींचं रिसॉर्ट बांधतात... त्या आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हा पप्पू शब्दाचा अपमान आहे" असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, राजकारण वेगळं आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री, तुमचे वडील मुख्यमंत्री आणि २०२१ मध्ये हा प्रकल्प गुजरातला जातो. आपल्यावरील खापर दुसऱ्याच्या माथी मारायचं. हे सर्व पाप २०२१ मधील आहे. एकनाथ शिंदे २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाले. लोकांमध्ये दिशाभूल निर्माण करायचं. संभ्रमाचं वातावरण बनवायचं असं राजकारण केले तर दुसरे पप्पू म्हणून यांची जागा कुठे असेल सर्वांना माहिती आहे, अशा शब्दात सत्तार यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. आता, आदित्य यांनीही सत्तारांना जशास तसे उत्तर दिलं आहे.
मी त्यांच्यासोबत बसत नाही, आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जे विचारलं ते मी करत नाही. म्हणून त्यांना वाईट वाटत आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसेच, काल खातेवाटप वेगळं झालेलंय, उद्योगमंत्र्यांनी शेतीबद्दल ट्विट केलंय, कृषीमंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातलेला आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्री कोण हे माहिती नाही कारण बांधावर कोणी आलंच नाही. उद्योगमंत्री कोण हे उद्योजकांना माहिती नाही, हे दुर्दैव आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"