मुंबई – सध्याच्या राजकारणात एकमेकांच्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यात शिवसेना-राष्ट्रवादीत फूट पडल्याने पक्षातच २ गट झालेत. भाजपातही पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा सुरू असते. त्यातच भाजपात आता खूप गर्दी झालीय असं म्हणत माजी मंत्री शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
या माजी मंत्र्यांचे नाव विनायक पाटील असे आहे. विनायक पाटील म्हणाले की, भाजपात सध्या खूप गर्दी आहे. त्यात माझी कुंचबना होत आहे. त्यामुळे गर्दीत राहण्यापेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून लोकांची सेवा करणे चांगले आहे. त्यासाठी मी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली म्हणून मी तिथे चाललोय. एका म्यानात २ तलवारी राहू शकत नाही. अजित पवारांसोबत आमच्या येथील आमदारही गेलेत. त्यामुळे शरद पवारांनी तुम्ही आमच्यासोबत या असं म्हटलं. माझीही पक्षात घुसमट होत होती. त्यामुळे मी शरद पवारांसोबत काम करणार आहे असं त्यांनी सांगितले.
कोण आहेत विनायक पाटील?
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विनायक पाटील २ वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी राज्यमंत्रिपदावरही काम केले आहे. मागील वेळी भाजपातील अंतर्गत गटबाजीचा फटका विनायक पाटलांना बसला त्यामुळे २०१९ मध्ये त्यांना पराभव सहन करावा लागला. अलीकडच्या काळात भाजपातील जिल्हा कार्यकारणीत त्यांना डावललं जातं होतं म्हणून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.
अहमदपूरमध्ये विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वितुष्ट आल्यानंतर बाबासाहेब पाटलांनी अजित पवार गटाला साथ देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विनायक पाटलांनी बाबासाहेबांविरोधात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे.