माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे आपल्या पक्षावर नाराज आहेत अशा बातम्या मागील काळात मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. त्यानंतर मुंडेंनी राजकारणातून काही काळ ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. पण, शिवपरिक्रमा यात्रेच्या माध्यमातून त्या पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या अन् जनतेत मिसळल्या. मागील काही कालावधीतील राजकीय बाबींवर प्रकाश टाकताना मुंडेंनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. शिवपरिक्रमा यात्रेतून शिवशक्ती आणि जनशक्तीचे आशीर्वाद मिळाले असून यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडेंची एक्स्लुझिव्ह मुलाखत लोकमत डिजिटलचे संपादक आशिष जाधव यांनी घेतली.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, आधीच्या पिढीने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना पाहिले आहे, पण ज्या पिढीने त्यांना पाहिले नाही ती मंडळी देखील आज माझ्यासोबत असल्याचे पाहून बाबांना अभिमान वाटत असेल. कारण त्यांना वाटत असेल की, माझ्या मुलीने माझी शक्ती अधिक वाढवली आहे. मुंडे साहेबांनी मला कधीच जातीवाद शिकवला नाही. मी आंतरजातीय विवाह झालेल्या घरात वाढली आहे. लोकांची मदत कशी करता येईल याबाबत मला शिकवण मिळाली आहे.
पंकजा मुंडेंची 'मन की बात'गोपीनाथ मुंडेंनीभाजपासाठी खूप काही केले आहे, त्यांनी राज्यात सर्वत्र पक्ष वाढवला पण पक्षाने त्यांच्यासाठी पाहिजे तेवढ न करणं हे खटकत नाही का? असे विचारले असता त्या म्हणाल्या, "मुंडे साहेब वारले तेव्हा मला वाटले की ते कोणासाठीच मर्यादीत राहिले नाहीत. २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी त्यांचे नाव घेतले. तेव्हा चार उमेदवार उभे होते आणि विशेष म्हणजे चारही बॅनरवर साहेबांचे फोटो होते. आमच्या पक्षाचा एक पॅटर्न आहे, त्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की आणखी काही करायला हवे. तसेच साहेबांचा सन्मान पक्षाने त्यांचा नेता म्हणून करावा माझे वडील म्हणून नाही."
...तर मी केंद्रात मंत्री झाले असते - पंकजा मुंडे"मागील काळात आम्ही काय गमावलं याबद्दल पक्ष चिंतन बैठक घेईल, हल्ली त्या बैठका कमी झाल्या असल्या तरी मार्ग काढला जाईल. पण, बाबांनी काय केलंय म्हणून मला काही नको किंबहुना मी त्यांची मुलगी आहे म्हणूनही मला काही नको. कारण तसं असतं तर मी बाबांच्या जाण्यानंतर केंद्रात मंत्री झाली असती. मात्र मीच केंद्रात जायला नकार दिला. बाबांच्या मृत्यूनंतर भाजपाकडे लोकांनी यावे यासाठी मी संघर्षयात्रा काढली. त्यामुळे माझ्या योगदानासाठीच पक्षाने मला द्यावे. बाबांनी दिलेल्या योगदानासाठी द्या असं मी म्हणणार नाही", असंही यावेळी त्यांनी सांगितलं.