मुंबई – युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असा इशारा दिल्यानंतर आता यावरून राजकारण पेटलं आहे. राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करून घोषणाबाजी करत आहेत. त्यावरून भाजपा नेते अनिल बोंडे यांनी शिवसेनेला खोचक सल्ला दिला आहे. आंदोलन करण्याऐवजी शिवसैनिकांनी हनुमान चालीसेचं पठण करावं असं बोंडे यांनी म्हटलं आहे.
अनिल बोंडे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी, मी माजी शिवसैनिक म्हणून सांगतो, राणा दाम्पत्याचा उदो उदो उद्धार करण्यापेक्षा हनुमान चालीसा पठण करा, हर हर महादेवच्या घोषणा द्या. मातोश्रीबाहेर बसलात आहात तर रामरक्षा म्हणा. महाबली हनुमानाचा जयजयकार करा. पवनसुत हनुमान की जय. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करा. पूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर हसतोय. आपण जेव्हा चांगला सल्ला देतो, तेव्हा समोरचा सत्तेने आंधळे झालेले लोकं कुणाचंही ऐकत नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी समजुतदारपणा दाखवून शिवसैनिकांना हनुमान चालीसा म्हणायला सांगा असं त्यांनी सांगितले.
तसेच मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हटल्याने जातीय तेढ कसा निर्माण होईल? उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसैनिक जमत असतील. ताणतणाव निर्माण करत असतील मग पोलिसांनी राणा दाम्पत्याप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनाही नोटीस पाठवायला हवी. जागोजागी शिवसैनिकांना जमवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम केले जात आहे. त्यामुळे जातीय सलोखा संपतोय, तेढ निर्माण होतोय त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निरपक्षेपणे कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही नोटीस बजावावी अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.
महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा डाव
राणा दाम्पत्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं सांगितल्याने त्यांना विरोध करण्यासाठी शिवसैनिक जमले आहेत. त्यावेळी अनिल देसाई यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, आमच्या रक्तात हिंदुत्व आहे. भाजपा नव्याने हिंदुत्व शिकतंय. त्यांना गरज आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे. कुणाला फूस लावून सोडलं आहे. स्वत: बिळात गेले आहे. हनुमान चालीसाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा डाव आहे असा आरोप देसाईंनी केला आहे.