मुंबई - काही महिन्यांवर आलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाकयुद्ध तीव्र झाले आहे. एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बेगडी हिंदुत्व परिधान केलेल्या शिवसेनेला औरंगाबादमधून हद्दपार करा, असे आवाहन केल्यानंतर शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका करणाऱ्या शिवसेनेला आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना भाजपा नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे.
शंभर कोटींवर १५ कोटी भारी पडतील, असे विधान करण्यात आले तेव्हा तुम्ही घरी बसला होता. स्वातंत्र्यवीर सावरकांना बलात्कारी म्हणणाऱ्यांशी तुम्ही दोस्ती केली आहे. मात्र आम्ही संभाजीनगर म्हटले तर तुम्ही अग्रलेखाची किती शाई वाया घालवलीत, पत्रपंडितहो तुम्ही तर मियाँ दरबारी आहात, अशा आशयाचे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. तसेच बेगडी हिंदुत्व पांघरलेल्या शिवसेनेला औरंगाबादेतून हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली होती.
दरम्यान, भाजपा आणि चंद्रकांत पाटील यांना सामनाच्या आजच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात भाजपचे घोडे हे अजूनही मोगलांप्रमाणे सरळ पाणी प्यायला तयार नाहीत. विरोधी पक्ष म्हणजे फक्त लाथा झाडायला आणि हवे तसे बेताल बोलायलाच उरला आहे काय? असा प्रश्न लोकांना पडत आहे. आम्हाला महाराष्ट्रात शांतता हवी आहे. दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधडय़ा भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती असा टोला भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.