मुंबई : कार्नेल विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेली आणीबाणी ही चूक होती, असे मोठे विधान केल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) यावरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आता जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. (bjp leader ashish shelar slams rahul gandhi over emergency statement)
भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींना टोला लगावला. ''राहुल गांधी यांनी आणीबाणीवरून माफी मागितली. आणीबाणी ही चूक असल्याचे कबूल केले. आणीबाणी चुकीची होती म्हणजे इंदिरा गांधी यांची त्यावेळची विचारसरणी चुकीची होती का? हेही राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे'', अशी मागणी आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना केली.
आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात'
कांजूरमार्गची जागा खासगी मालकीची
कांजूरमार्गची जागा खासगी मालकीची आहे. कोर्टात हे सांगितले आहे. खासगी मालकाकडून आता ही जागा विकत घेतली जाणार आहे. त्यात भ्रष्टाचार होणार आहे. या जागेची किंमत ५० हजार कोटी असू शकते. जागा मालकासोबतचे साटेलोटे आता उघड होऊ लागलेत. सांगा कितीचा ठरलाय व्यवहार? अगोदरच ठरला होता ना हा व्यवहार?, असे अनेक प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले.
गोध्रा दंगलीबद्दल नरेंद्र मोदी देशाची माफी मागणार का?
इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीबाबत राहुल गांधींनी माफी मागणे यात आम्हाला गैर वाटत नाही. राहुल यांनी मनाचा मोठेपणा दाखवून चूक स्वीकारली. इंदिरा गांधींनी केलेल्या चुकीची त्यांनी कबुली दिली. आता गोध्रा दंगलीबद्दल गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची माफी मागणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचं मत व्यक्त केले. प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत म्हटलं की, आणीबाणी घोषित करणं इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसनं कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षानं स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला.