Maratha Reservation Bill: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले होते. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र, यावरून राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली असून, विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मते मिळवण्यासाठी सरकारने ही नौटंकी केली आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर अशोक चव्हाण यांनी पलटवार केला आहे.
चांगले होताना कुणी अपशकुन करू नये
विधिमंडळात मराठा आरक्षणाबाबत विधेयक मंजूर झाले. शेवट गोड होतोय ही आनंदाची बाब आहे. हे आरक्षण निश्चितच टिकेल. विरोधी पक्षाने सरकारची बाजू घ्यावी, असे माझे मत नाही. पण एखादे चांगले होत असताना कुणी अपशकुन करू नये, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी विजय वडेट्टीवार यांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
दरम्यान, सभागृहात सर्व पक्षांनी एक मताने मराठा आरक्षण ठराव मंजूर केला. मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करून हे विधेयक मांडले गेले, हे विधेयक टिकेल अशी मला आशा वाटते. मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. मराठा समाजाने खूप लढा दिला आहे. मराठा समाजातील अनेकांना बलिदान द्यावे लागले. आंदोलकांची जी डोकी फोडली गेली, ते न करता शांततेने हा विषय सोडवता आला असता. टिकणारे आरक्षण मिळेल अशी आशा बाळगतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.