"उद्धवजी लक्ष देत नसतील तर राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावे; दोघांची वैचारिक उंची सारखीच"
By जयदीप दाभोळकर | Published: January 11, 2021 02:05 PM2021-01-11T14:05:38+5:302021-01-11T14:11:55+5:30
भाजपा नेत्याचा जोरदार टोला
भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून टीका केली होती. यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
"उद्धवजी अगदीच लक्ष देत नसतील तर संजय राऊतांनीराहुल गांधींना सल्ले द्यावेत. मोदीद्वेषाचा कॉमन फॅक्टर आहेच. शिवाय दोघांचे विचार आणि वैचारिक उंची सारखी आहे," असं म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला. "इतिहास साक्षी आहे ज्या पत्रकारांनी वैयक्तिक आकस आणि द्वेषातून मोदींचा विरोध केला, जनतेने त्यांचा बाजार उठवला. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, जनता जनार्दनाची सेवा करून तिसाऱ्यांदाही होतील," असं भातखळकर म्हणाले.
उद्धवजी अगदीच लक्ष देत नसतील तर संजय राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावेत...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 11, 2021
मोदीद्वेषाचा कॉमन फॅक्टर आहेच शिवाय दोघांचे विचार आणि वैचारिक उंची सारखी आहे...
इतिहास साक्षी आहे ज्या पत्रकारांनी वैयक्तिक आकस आणि द्वेषातून मोदींचा विरोध केला, जनतेने त्यांचा बाजार उठवला... मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, जनता जनार्दनाची सेवा करून तिसाऱ्यांदाही होतील...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 11, 2021
"नेहरूंनी केलेली कामे (की कांड) निस्तारण्यासाठीच जनतेने मोदींना दुसऱ्यांदा प्रचंड समर्थन देऊन पंतप्रधान बनवले. संजय राऊतांसारख्या बोरूबहद्दरांच्या मतांना मोदी किंमत देत नाहीत हे देशाचे भाग्य. नेहरूंनी जसं काश्मीरचा मुद्दा केला. चीनच्या समोर शरणागती पत्करली, तसं मोदींनी करावं असं संजय राऊतांचं म्हणणं दिसतंय. पंतप्रधान नेहरू होते म्हणून देशाच्या आरोग्य व्यवस्थेचीही वाट लागली. ७० वर्षांनंतर पंतप्रधान झाल्यावर मोदींना शौचालय बांधण्यापासून काम करावं लागलं. मुंबईत काय घडतंय महाराष्ट्रात काय होतंय याकडे पहिलं लक्ष द्या. मुंबई महानगरपालिकेत तुमची अनेक वर्ष सत्ता आहे. तिकडे ४० हून अधिक रुग्णालयं बेकायदेशीरपणे काम करतायत. ६० रुग्णालयांचं फायर ऑडिटही झालेलं नाही. त्यामुळे मोदी आणि अमित शाह यांना सल्ले देण्यापेक्षा स्वत:च्या पायाखाली काय जळतंय हे पाहा," असंही ते म्हणाले.
नेहरूंनी केलेली कामे (की कांड) निस्तारण्यासाठीच जनतेने मोदींना दुसऱ्यांदा प्रचंड समर्थन देऊन पंतप्रधान बनवले. संजय राऊतांसारख्या बोरूबहद्दरांच्या मतांना मोदी किमंत देत नाहीत हे देशाचे भाग्य... pic.twitter.com/b0wkPnqb89
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 11, 2021
"देवेंद्र फडणवीस हे भंडाऱ्याला गेल्यानंतर तुमच्या घरबशा मुख्यमंत्र्यांना नाईलाजानं का तिकडे जावं लागलं. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्वीट केल्यानंतर १० मिनिटांनी त्यांना ट्वीट करावंस वाटलं. त्यामुळे राज्य कारभारात लक्ष द्या आणि फुकटचे सल्ले देणं बद करा," असंही भातखळकर यांनी नमूद केलं.