Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेले नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना जीभ घसरली. अतिशय अभद्र भाषेत अब्दुल सत्तार यांनी विधान केले. अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात माफी मागितली असली, तरी राज्यात अनेक ठिकाणी अब्दुल सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून राष्ट्रवादीने आक्रमक होत तीव्र निषेध व्यक्त केला. यातच यासंदर्भात भाजप नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. मात्र, या प्रकरणी भाष्य करताना, उद्धव ठाकरे यांनी कंगना रणौत, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रत्येक महिलेचा आदर-सन्मान व्हायला हवा. महिलांनीही बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. पुरुषांनी तर सन्मानच केला पाहिजे. पण मी महिला आहे म्हणून मी वाट्टेल ते बोलेन आणि त्याला जर उत्तर आले तर महिलांची अस्मिता दुखावली गेली असं म्हणत असाल तर ते बरोबर नाही. दोघांनीही एकमेकांचा आदर-सन्मान ठेवायला हवा. उत्तराला प्रत्युत्तर असते, अशी प्रतिक्रिया भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिली. चित्रा वाघ यांच्यासह भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आधी माफी मागावी…
अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. कोणीही महिलांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध व्हायला हवा. परंतु संजय राऊंतांना, किशोरी पेडणेकरांना असे शब्द वापरण्याची सुट दिली होती का, तमाम निषेध गॅंगने???, अशी विचारणा करत, दुसऱ्या एका ट्विटमध्ये, उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी…, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच. पण महिलांचा अपमान झाल्यावर निवडक नेत्यांविरोधात संताप कितपत योग्य? कंगना रनौत, स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही? महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच. गेल्या अडीच वर्षांत काही का केले नाही? संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत? एका अभिनेत्रीला हरामखोर म्हणणे हे योग्य आहे का? स्वप्ना पाटकर महाराष्ट्रातील मुलगी नव्हती का? त्यांच्यावर बोलल्यानंतर संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत? अशा प्रश्नांची सरबत्ती चित्रा वाघ यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"