Gram Panchayat Election Result: राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. ७४ टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली असून, सदस्यांसह थेट सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल लागत आहे. राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित ग्रामपंचायतींचे निकाल लागणार आहेत. अशातच ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप बाळासाहेबांची शिवसेना युती बाजी मारणार यात शंकाच नाही, असा विश्वास भाजप नेत्याने व्यक्त केला आहे.
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीत भाजप बाळासाहेबांची शिवसेना युती बाजी मारणार यात शंकाच नाही. जनतेचा अपरंपार विश्वास आणि कार्यकर्त्यांचे अफाट परिश्रम विजयश्री युतीच्या बाजूने खेचून आणणारच, असा विश्वास अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला आहे.
लिहून घ्या, भाजपच महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन राहील
दुसरीकडे, नागपुरात पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपाचाच विजय होईल, असे म्हटले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आहे. तुम्हाला सांगतो की, लिहून घ्या, महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील. कोणी काहीही नरेटीव्ह केले तरी आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील. कोणी काहीही काळजी करु नका, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. यात सरासरी ७४ टक्के मतदान झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झाले. त्यामुळे या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो, कुणाच्या नावाने गुलाल उधळला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"