मुंबई: राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्यानं लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला असताना जालना जिल्ह्यात मात्र लसींचा अधिकचा साठा शिल्लक आहे. जिल्ह्याला १० दिवस पुरेल इतका अतिरिक्त साठा उपलब्ध आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेजालना जिल्ह्याचे आहेत. लसींचा तुटवडा असल्यानं राज्याच्या अनेक जिल्ह्यांत लसीकरण मोहीम थांबवावी लागली असताना आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र लसींचा मुबलक साठा असल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्रानं दिलं आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी यावरून आता आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
"राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?" असा सवाल भाजपाने विचारला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "केंद्राकडून मिळालेल्या २६.७७ लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला १७ हजार ऐवजी ६० हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?..." असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
डॉ. राजेश टोपे विधानसभेत जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्न करतात. ३१ मार्चला केंद्राकडून राज्याला २६.७७ लाख लसींचे डोस मिळाले. यापैकी ६० हजार डोस जालना जिल्ह्याला मिळाले. विशेष म्हणजे जिल्ह्याचा कोटा १७ हजार इतकाच होता. मात्र प्रत्यक्षात त्याच्या तिपटीहून अधिक डोस जिल्ह्याला मिळाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोपेंनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना स्वत:च्या जिल्ह्याला अधिकचा लस पुरवठा करण्यास सांगितलं होतं. मात्र लसींच्या पुरवठ्यात कोणत्याही जिल्ह्याला प्राधान्य दिलं गेलं नसल्याचा दावा टोपेंनी केला.
राज्यात कोरोना लसींचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात मात्र १० दिवसांचा साठा
जालना जिल्ह्याला लसीचे अधिकचे डोस मिळाले असल्यास ते लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी दिले गेले असावेत, असंदेखील टोपे पुढे म्हणाले. लसीकरणचा वेग वाढवण्यासाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि उपकेंद्रांना लसींचं वाटप केलं आहे, असं टोपेंनी सांगितलं. राज्याच्या तुलनेत जालन्यातील लसीकरणाचा वेग कमी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यातील इतर जिल्ह्यात सरासरी २७ टक्के लोकांचं लसीकरण होत असताना जालन्यात मात्र हीच टक्केवारी १८.१ टक्के असल्याची आकडेवारी टोपेंनी दिली.