मुंबई : ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोना लस घेतल्याची माहिती मिळाली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून, पूर्णत: बेकायदेशीर आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे. (bjp leader atul bhatkhalkar slams shiv sena on corona vaccination)
कोरोना नियमावलीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनेची मानसिकतेचा हा ढळढळीत पुरावा आहे, अशी टीका करत बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी नरेश म्हस्के आणि रविंद्र फाटक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिवसेनेवर हल्लाबोल
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. या ट्विटसह त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ''एकीकडे वनमंत्री संजय राठोड कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून प्रचंड गर्दी जमवतात आणि दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरियर्स यांसारख्या गरजूंना मागे सारून नेते स्वतःच कोरोनाची लस घेतात, अशी टीका त्यांनी केली आहे.
भाजपला मोठा धक्का! खडसेंच्या पुढाकाराने १३ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
दातखिळी बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी भाष्य करावे
रांगेतील ही घुसखोरी शिवसेनेची आपमतलबी राजकीय संस्कृती दाखवणारी घटना आहे. भाजप याविरोधात आवाज उठवेल. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांची दातखिळी बसलेली आहे, त्यांनी या सर्व प्रकरणांवर भाष्य करावे. अन्यथा भाजपला याविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशाराच अतुल भातखळकर यांनी यावेळी बोलताना दिला.
आधी आपल्या नेत्यांना नियम शिकवा
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असूनही कोरोनाविरोधातील लसीकरण कार्यक्रमात महाराष्ट्र मागे का आहे, हेच यातून स्पष्ट होते. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना आधी कोरोनाचे नियम शिकवावे, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी यावेळी लगावला.