धर्म ही अफूची गोळी आहे व देशातील बहुसंख्य जनतेला रोजच या अफूची मात्रा दिली जात असल्याने जनता एक प्रकारच्या गुंगीतच आहे. महागाईविरुद्ध आंदोलनाची खिल्ली उडवताना भाजपतर्फे हीच अफूची गोळी पुन्हा चारली आहे. महागाई विरोधात काळे कपडे घालून काँग्रेसने आंदोलन केले. याचा संबंध भाजपने अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाशी जोडला, असे म्हणत शिवसेनेने टीकेचा बाण सोडला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर हल्लोबोल केला. दरम्यान, आता यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.
“सरबरलेले, गोंधळलेले बुळबुळीत नेतृत्व. ज्वलंत हिंदुत्वाचा नारा देणारे आता म्हणतायत धर्म ही अफुची गोळी,” असं म्हणत भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हटलंय संपादकीयमध्ये?महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या प्रश्नांवर आणि ‘ईडी’ वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे. रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे व त्याची दखल देशातील अन्य विरोधी पक्षांनी घेऊ नये याचे आश्चर्य वाटते. महागाई, बेरोजगारी हे विषय गंभीर आहेत, पण त्यावर बोलणाऱ्यांना देशद्रोही अथवा धर्मद्रोही ठरवले जाते, असे शिवसेनेने म्हटले आहे.
प्रत्येक समस्या, प्रश्नांचा संबंध धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे? महागाई-बेरोजगारीचा भस्मासूर उसळला आहेच. आंतरराष्ट्रीय बाजारातील कारणे काहीही असतील. पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरीवर गेले व त्याचा फटका सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यास बसत आहे. महागाई व बेरोजगारीवर राम मंदिर हा उतारा नाही. राम मंदिर ही श्रद्धा व राष्ट्रीय अस्मिता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्येत राम मंदिर होतच आहे. मात्र लोकांनी तुम्हाला सत्ता जी दिली आहे, ती सर्वसामान्यांचे जगणे सुसहय़ करायला, असेही त्यांनी नमूद केलेय.