अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) मोठी कारवाई केली आहे. मुंबईत आज जवळपास २० ठिकाणांवर एनआयएनं छापे टाकले. ही सर्व ठिकाणं दाऊदचे शार्प शूटर्स, ड्रग्ज पेडलर्स यांच्याशी निगडीत असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय दाऊदच्या हवाला ऑपरेटर्सवरही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकावर जोरदार निशाणा साधला आहे.
“मुंबईत आज सकाळी NIA ने २० ठिकाणी, विशेषत: दाऊद इब्राहिमच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या आहेत. कोणताही दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, गोळीला गोळीनेच चोख प्रत्युत्तर दिले जाईल हेच मोदी सरकारचे धोरण या धाडींनी अधोरेखित झाले आहे. धन्यवाद मोदी सरकार,” असं भातखळकर म्हणाले. तसंच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला.
“NIA ची कारवाई ठाकरे सरकारचा बुडत्याचा पाय खोलात घालणार हे नक्की. अनेकांचे दाऊद कनेक्शन यातून अधिक ठसठशीतपणे लोकांच्या समोर येईल यात शंका नाही,” असंही ते म्हणाले.
अनेक ठिकाणी छापेएएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दाऊदशी निगडीत मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आणि इतर काही ठिकाणी एनआयएनं छापे टाकले केली आहे. अनेक हवाला ऑपरेटर्स आणि ड्रग्ज पेडलर दाऊदशी संबंधित असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. फेब्रुवारीमध्या या संदर्भात नोंद घेण्यात आली होती. आजपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे, असंही एनआयएकडून सांगण्यात आलं आहे.