मुंबई - साधारणपणे वर्षभरापूर्वी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात हिंसाचाराची घटना घडली होती. यानंतर मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वर काही मंडळींनी आंदोलन केले होते. यावेळी 'फ्रि काश्मीर'ची मागणी करणारे पोस्टर झळकले होते. यावरून विरोधकांनीही राजकीय वातावरण तापवले होते. यानंतर, 'फ्रि काश्मीर'चा फलक हातात असलेली तरुणी महेक मिर्झा प्रभू हिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी मंगळवारी या तरुणीविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
यासंदर्भात भातखळकर यांनी ट्वट करत, "वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर जेएनयुतील तुकडे गॅंगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात "काश्मीर मुक्त करा" चे फलक होते त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा, असे म्हटले आहे.
महेकवर 7 जानेवारीला आयपीसीच्या कलम 153 'बी'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यान, पोलिसांना यामागे कुठलाही वाईट हेतू दिसून आला नाही. यामुळे महेकवरील गुन्हा मागे घेण्यात आला आहेत. पोलिसांनी यासंदर्भात 'सी' सारांश रिपोर्ट दाखल केला आहे. यानंतर न्यायालय, तो स्वीकारायचा अथवा नाही यासंदर्भात निर्णय घेईल. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर चुकूण गुन्हा दाखल केला जातो अथवा त्याच्या विरोधात चुकीची तक्रार नोंदवली जाते, तेव्हा, 'सी' सारांश रिपोर्ट दाखल केला जातो.