Sambhaji Brigade- Shivsena Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवारी मोठी घडामोड दिसून आली. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडनं शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाही असं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. दरम्यान, यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे जोरदार टोला लगावला.
“काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा करून निम्मा पक्ष गारद केला. आता उरलेला पक्ष संपवण्याठी ब्रिगेड जवळ केलेली दिसते. सगळचं संपल की मग घरी शांतपणे रोज मम्म करायचं आणि मग गाई गाई करायची,” असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला. खोटा इतिहास सांगण्याचे, थापा मरण्याचे कौशल्य हा उद्धव ठाकरे आणि ब्रिगेड मधला समान धागा आहे, त्यामुळे ही युती नैसर्गिक असल्याचं म्हणत त्यांनी टोला लगावला.