Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा महाराष्ट्रात येत असून, काँग्रेस पक्षाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. महाविकास आघाडीचा सदस्य पक्ष असलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनाही भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलेल आहे. मात्र, दोन्ही नेत्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच भाजपने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचे १४ मुक्काम, १० कॉर्नर सभा, तर दोन भव्य सभा देखील होणार आहेत. सुरक्षेच्या कारणांमुळे अकोला जिल्ह्यात राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. पहिली सभा ही १० नोव्हेंबरला नांदेडमध्ये तर दुसरी सभा १८ नोव्हेंबरला गजानन महाराजांच्या शेगावात होणार आहे. महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यात मिळून यात्रेचा ३८४ किलोमिटरचा प्रवास होणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवस ही यात्रा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर खोचक टोला लगावला आहे.
सर्वोत्कृष्ट निखळ मनोरंजन येते आहे…
महाराष्ट्रात येत असलेल्या भारत जोडो यात्रेवरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. तारक मेहताचा टीआरपी पण कमी होईल, सर्वोत्कृष्ट निखळ मनोरंजन येते आहे…, असे खोचक ट्विट करण्यात आले आहे. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, या शब्दांत बावनकुळे यांनी या यात्रेवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आगमन होणार आहे. काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून भारत जोडो यात्रेचे स्वागत होणार आहे. ही यात्रा नांदेडात चार आणि हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिममधून मार्गक्रमण करेल. नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे राहील. शंकरनगर रामतीर्थ, वझिरगाव फाटा, पिंपळगाव महादेवमार्गे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होईल. भारत जोडो यात्रेत पहिल्यांदाच रात्री मशाल यात्रा निघणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"