पुणे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. "आम्ही एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका बजावतच आहोत. त्यामुळे जयंतरावांनी आमची काळजी करण्याचं कारण नाही. फुकटातलं मिळालंय ते जरा व्यवस्थित हजम करून घ्या. आमची चिंता करू नका. फुकटातं मिळालेलं अधिकाधिक दिवस कसं राहील यासाठी दिवसरात्र मेहनत घ्या," असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ते पश्चिम महाराष्ट्र भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
तत्पूर्वी, पुढील चार वर्षं आम्हीच सत्तेवर राहणार. आमदारांनी पक्ष सोडू नये, म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार लवकरच पडणार असल्याचे बोलावे लागत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. यावरून चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
उद्धव ठाकरेंना दिल्लीत पाठवू - बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा, असा सल्ला शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिला आहे. यासंदर्भात विचारले असता, त्यांना सल्ला द्यायला दिल्लीत पाठवू या. येथे बोलून काय फायदा? त्यांना आता अमेरिकेतही पाठवायचे आहे. मी तिकिटाची व्यवस्था करतो. असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.
ठाकरे सरकार महाराष्ट्राचं काय करणार हे कळत नाही. हे सरकार पार गोंधळलेलं आहे. सार्थी रद्द केली, अण्णासाहेब पाटीर महामंडळ बरखास्त केले, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि महिला अत्याचारांसह विविध मुद्द्यांवर हे सरकार गोंधळलेले आहे. या सरकारला कोणताही निर्णय घेता येत नाही, असा टोलाही पाटील यांनी यावेळी ठाकरे सरकारला लगावला.
यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरही भाष्य केले. प्रत्येक निवडणुकीत चॅलेंज असतेच. मात्र, तरीही ही निवडणूक सहज जिंकू, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.