'अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत; उद्धव ठाकरेही कंटाळतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 09:09 AM2020-01-29T09:09:18+5:302020-01-29T09:10:49+5:30
चोरुन सत्तेवर आलेल्या महाविका आघाडीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला नाही.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील निकष आणि अटींविरोधात भाजपाकडून कोल्हापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. चुकीचे निकष आणि जाचक अटी रद्द करुन सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय भाजपा शांत बसणार नसल्याचे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, चोरुन सत्तेवर आलेल्या महाविका आघाडीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. तसेच सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. त्यामुळे कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा होणार नाही. त्यामुळे चुकीचे निकष आणि जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शांत दिसतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळ्या घोषणा करत आहेत. त्यामुळे नक्की मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे की अजित पवार असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवारांना एक दिवस उद्धव ठाकरेच कंटाळतील असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर आणण्याणासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे. सरकारला जाग येत नसल्यानेच शाहू महाराजांच्या कोल्हापूरातून आम्ही हा आवाज उठवला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच या योजनेमध्ये पीककर्जाचा उल्लेख केल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या, बँका आणि पतसंस्थांचे कर्ज काढलेल्या, मायक्रो फायनान्सचे,भूविकासचे कर्ज काढलेल्या अशा कोणत्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नाही. 2019/ 20 या वर्षातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश नाही. म्हणूनच आम्ही सरसकट कर्जमाफीचा आग्रह धरत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.