Kasba Bypoll Election Result 2023: महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, महाविकास आघाडीचे नेते भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच आता भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत पुन्हा जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू!, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
...म्हणून हेमंत रासने यांना तिकीट दिले
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिली. मुक्ता टिळक या पुण्याच्या आणि कसब्याच्या मतदारांच्या लाडक्या होत्या. त्यांचे निधन झाल्याने कसब्यातील सर्वसामान्य जनतेलाही दु:ख झाले होते. पण त्यांच्या जाण्यानंतर त्यांचा मुलगा कुणाल टिळक याला आम्ही भाजपतर्फे उमेदवारी न देण्यामागे कारण होते. कुणाल टिळक हा वयाने अजूनही लहान आहे. त्यातच त्यांच्या परिवारातून त्यांनी, आम्हाला तिकीट हवेच आहे, असे अजिबात हट्ट धरला नव्हता. हेमंत रासने यांनीही खूप काम केले असल्याने त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला गेला. पण रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल सहानुभूती असल्याने हा निकाल लागला, असे बावनकुळे यांनी स्पष्टिकरण दिले.
दरम्यान, मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यानेही प्रतिक्रिया दिली. आम्ही सगळे कुटुंबीय प्रचारात सामील झालो होते. देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, सगळ्या नेत्यांनी सभा घेतली. पण पराभव का झाला, याचा विचार करण्याची गरज आहे. ज्या चुका झाल्यात त्याचा विचार केला पाहिजे. आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलो होतो, त्यावेळी लोकांनीही भाजपला मतदान करणार असं सांगितलं. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रचार केला होता. आता कुठे तरी दुर्दैव म्हणावं लागेल कारण धंगेकर हे वेगळ्या प्रचारासाठी ओळखले जातात, असे कुणाल टिळक याने म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"