मुंबई: आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला होता. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे.
विधान भवन परिसरात मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जितेंद्र आव्हाड माझा बाप काढतात, ती आव्हाडांची संस्कृती आहे. माझा बाप काढून, उद्धव ठाकरेंच्या जवळ जातील, यापेक्षा जास्त आव्हाडांना काय मिळणार? असा सवाल त्यांनी केला. तसेच, आमच्या वडिलांनी कधीच निवडणूक लढवली नव्हती, ते मिलमध्ये काम करत होते, असंही पाटील म्हणाले.
जबाबदारी पार पाडापाटील पुढे म्हणाले की, विधानसभेत अनेक प्रश्नांशी मुख्यमंत्र्यांनाच डील करावी लागते. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस सतत सावध असायचे. विदेशात गेल्यावरही ते चार जणांना कामे नेमून द्यायचे. एल्फिस्टनचा ब्रिज पडला तेव्हा ते विदेशात होते, मुंबईत आल्यावर ते डायरेक्ट घटनास्थळी गेले. तुम्ही आमदार व्हा, मंत्री व्हा यासाठी कोणी निमंत्रण देत नाही, तुम्ही स्वत: जबाबदारी घेतली असेल तर पार पाडायला पाहिजे, असही ते म्हणाले.
उद्धवजींसाठी रोज प्रार्थना करतो...यावेळी चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरही भाष्य केले. उद्धवजींची तब्येत बरी होण्यासाठी मला प्रदर्शन करण्याची गरज नाही. मी रोज प्रार्थना करत असतो. त्यांना आराम मिळावा ही सर्व देवतांना प्रार्थना करत असतो. ते मुख्यमंत्री आहेत. आजारी असताना त्यांनी विधानसभेत येण्याचा हट्ट धरू नये. त्यांनी दुसऱ्यांना जबाबदारी द्यावी. उद्धवजींच्या तब्येतीबाबत विरोधकांनी मला समजून सांगण्याची गरज नाही. संघाने आणि माझ्या आईबापाने मला संस्कार दिले आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.