Chandrakant Patil: संजय राऊत जर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला बसले तर बाळासाहेब वरुन त्यांच्या थोबाडीत मारतील, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी देश आज काँग्रसेच्याच पुण्याईवर उभा आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी राऊतांचा जोरदार समाचार घेतला.
"संजय राऊत यांनी एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला पाहिजे. त्यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांना हा प्रश्न विचारावा. मग बाळासाहेब ठाकरेही वरुन संजय राऊत यांच्या थोबाडीत मारतील", अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. "मला संजय राऊत यांच्यावर रोज टीका करायला आवडत नाही. मात्र ते रोज काहीतरी बोलतात मग मलाही उत्तर द्यावं लागतं", असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
अजित पवारांना दिला सांभाळून बोलण्याचा इशाराचंद्रकांत पाटील यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र झोपेत असतानाच सरकार पडेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य झोपेत असताना केलं की जागं असताना असा मिश्कील टोला हाणला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच संताप झालेला पाहायला मिळाला.
"झोपेत कसं सरकार आणायचं हे अजित दादांनाच चांगलं माहित आहे. खुद्द शरद पवार झोपेत असताना त्यांनी सरकार आणलं होतं हे ते विसरलेत का? ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही तीन दिवसांचं का होईना पण सरकार स्थापन केलंत त्यांच्यावर टीका करताना जरा तरी विचार करा", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यासोबतच "अजित दादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे. जर बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल", असा थेट इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. त्यामुळे अजित पवार आणि चंदक्रांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.