मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांना संबोधित केले. सकाळपासूनच मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. त्यांना संबोधित करण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह बाहेर आले आणि ओपन कारमधून भाषण केलं. यावेळी शिवधनुष्य चोरीला गेलंय. निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला. दरम्यान, यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
“उद्धवजी बाळासाहेबांच्या विचारांची कॉपी करा. गेल्या अडीच वर्षांत सरकार चालवण्यासाठी तुम्ही कधी घराबाहेर पडला नाहीत आणि आज कारच्या सनरूफचा आधार घेत मातोश्रीच्या बाहेर पडून भाषण करत आहात. पण बाळासाहेबांच्या फोटोची कॉपी करण्यापेक्षा त्यांच्या हिंदुत्त्ववादी विचारांची कॉपी करा,” असं म्हणत टीकेचा बाण सोडला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? कट कारस्थानाचं राजकारण सुरू आहे. शिवसेना संपवण्याचं काम सुरु आहे. मात्र शिवसेना संपवता येणार नाही. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, असं म्हणत आता लढाई सुरु झालीय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “तसेच आज माझ्याकडे काहीच नाही, परंतु मी खचलेलो नाही, खचणारही नाही, असं म्हणताना उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आजपासूनच निवडणुकांच्या तयारीला लागा, चोरांचा आणि चोर बाजारांचा आपण नायनाट करू,” असा आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला.