काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या फ्लाइंग किसवरून सत्ताधारी भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. गांधींनी महिला खासदारांचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपा खासदारांनी केला आहे. तर विरोधी बाकावरील खासदारांनी भाजपाला फटकारले आहे. भाजपाच्या महिला खासदारांनी बुधवारी राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सभापतींकडे केली. खरं तर राहुल यांनी सभागृहात भाजपा खासदाराला फ्लाइंग किस केला असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाने केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गांधी यांच्या त्या कृत्याचा दाखला देत भाजपाला लक्ष्य केले. फ्लाइंग किसवेळी घडलेला प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, "मी तिथे व्हिजिटर गॅलरीत होती आणि राहुल गांधींनी तिथून निघताना केवळ प्रेमाचा हावभाव म्हणून हे कृत्य केले. पण, भाजपाला द्वेषाची सवय झाली आहे, म्हणूनच ते हे प्रेम स्वीकारत नाहीत."
प्रियंका चतुर्वेदी यांच्या या विधानाचा दाखला देत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले. चतुर्वेदी यांच्यावर टीका करताना चित्रा वाघ म्हणाल्या, "संसदेसारख्या सर्वोच्च व्यासपीठावरून स्त्रियांचा मानभंग करणाऱ्या फ्लाईंग किससारख्या कृतीचं प्रियांका चतुर्वेदी समर्थन करताहेत, ही खरंच लाजिरवाणी बाब आहे. एरवी महिला सन्मानाचा कैवार घेऊन शब्दांच्या फैरी झाडणाऱ्या प्रियांकाताईंना फ्लाईंग किस म्हणजे राहुल गांधी यांच्या तथाकथित 'मोहब्बत की दुकान'मधली एखादी निरूपद्रवी वस्तू वाटत असावी की, जी समोरच्याने इच्छा असो अथवा नसो, स्वीकारलीच पाहिजे."
तसेच स्वत: महिला खासदार असूनही राहुल गांधींच्या या कृतीचं समर्थन करणाऱ्या प्रियांका चतुर्वेदींचा जाहीर निषेध. अशा प्रवृत्तीला पाठिशी घालत आपल्या पक्षात थारा देणाऱ्या उद्धव आणि आदित्य ठाकरेंची मानसिकताही यातून दिसून येते, अशा शब्दांच वाघ यांनी ठाकरेंना देखील लक्ष्य केले.