Murlidhar Mohol : पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेलेल्या मुरलीधर मोहोळ यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी महापौर ते केंद्रीय मंत्री अशी कामगिरी केली आहे. पुण्याला बऱ्याच वर्षानंतर मंत्रिपद मिळाल्याने मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले जात आहे. मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिमंडळाता स्थान मिळाल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दात टीका केली होती. त्यांच्या टीकेला मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी मंत्री पदाची शपथ घेतली. मुरलीधर मोहोळ यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. यानंतर मोहोळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना खोचक टीका केली होती. पुण्याला मंत्रिपद मिळालंय याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॅान्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला होता. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोहोळ यांचे मंत्रिपद तुम्हाला पचनी पडले नाही असं म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्त्युतर दिलं.
"मोठ्ठ्या ताई सुप्रिया सुळे. एका सर्वसामान्य घरातल्या शेतकऱ्याच्या मुलाला केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याचं तुमच्या पचनी पडलेलं दिसत नाहीये. मुरलीअण्णा तुमच्यासारखे घराणेशाहीच्या भांडवलावर नव्हे, तर पक्षनिष्ठा आणि जनतेच्या प्रेमाच्या बळावर राजकीय गरूडभरारी घेऊ शकलेत. मनाचा उमदेपणा दाखवून त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आनंद व्यक्त करायचा सोडून आपण आपल्या स्वभावाला साजेशी मळमळ मात्र व्यक्त केलीत. पण मला खात्री आहे की, मुरलीअण्णांना संसदेत पहायची तुम्हाला लवकरच सवय होईल. तेव्हा ते फक्त पुण्यापुरताच नाही, बारामतीपुरताच नाही तर अवघ्या देशाच्या विकासाचे निर्णय घेताना तुम्हाला दिसतील. तुम्ही मात्र बारामतीच्या ग्रामीण भागातील जनतेला मागच्या १५ वर्षांपासून शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या आश्वासनावर झुलवत आलात, यावेळी किमान तेवढं तरी पूर्ण करायचं बघा. त्यासाठी तुम्ही तुमच्या बगलबच्च्या कंत्राटदारांना दूर ठेवा. नाही तर बारामतीची जनता पुढल्या वेळी कंत्राटदारांसोबत तुम्हालाही दूर ठेवेल," असे चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
"पुण्यात प्रशासन नाही. आज मी कोयता गँगने तोडफोड केल्याची बातमी पाहिली. पुण्यात पाणी तुंबतय. ससूनची बदनामी सुरु आहे. ड्रग्ज सुरु आहे. पुण्यासाठी पक्ष विरहीत फोरम स्थापन करा. पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. पुण्याला मंत्रीपद मिळालंय, त्याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा", असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं.