राज्यात लोकसभा निवडमुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच विविध पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. दरम्यान, आरोप-प्रत्यारोप करताना नेतेमंडळींचा तोल जातानाही दिसत आहे. यातच, शिवसेना नेते (ठाकरे गट) संजय राऊत यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात पत्रकारांसोबत बोलताना, "ते (देवेंद्र फडणवीस) राजकारणातलं अत्यंत कच्चं मडकं आहेत. कॉपी करून पास झालेली पोरं असतातना, त्यांना डॉक्टरकी करता येत नाही. मग पेशंट मरतात टेबलावरच. त्या प्रकारचे फडणवीस आहेत," असे वक्तव्य केले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर "ओऽऽऽ टीनटप्पर सर्वज्ञानी…" म्हणत निशाणा साधला आहे.
वाघ यांनी सोशल मीडिया प्लॅट फॉर्म एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे, "ओऽऽऽ टीनटप्पर सर्वज्ञानी… देवेंद्र फडणवीस काय आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. देवेंद्रजी राजकारणाच्या विद्यापीठातलं अस्सल मेरिट मटेरियल आहेत; तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे मात्र वकुब नसलेले टमरेल आहात. त्यामुळे ४ जूनला तुम्ही जनतेकडून सणसणीतपणे लाथाडले जाणार आहात. कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठे तुम्हा नकलींचा कमअस्सल खोटा शिक्का…? देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही. जनतेची नाडी व्यवस्थित समजणारे ते निष्णात डॅाक्टर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे सल्ले उद्धव ठाकरेंना द्या."
एवढेच नाही तर, "आमच्या नेत्यांना खालच्या पातळीवर बोलाल, तर त्याच पातळीवर तुम्हाला उत्तरं मिळतील लक्षात ठेवा," असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे. तसेच ही पोस्ट त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाही टॅग केली आहे.
काय म्हणाले होते राऊत - उद्धव ठाकरे यांना १९९९ पासून मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, असा प्रश्न विचारला असता, यावर बोलताना राऊत म्हणाले होते, “आम्हाला स्वप्न पडत नाहीत. आम्ही स्वप्नात कधी जगत नाही. आमची जी स्वप्न आहेत ती राष्ट्रहीत आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहेत. तुम्हाला जो काही स्वप्नातला अजार झाला होता, तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झाली आहे.”
यावर, नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले, असे फडणवीस म्हणाले, असे विचारले असता, उत्तर देताना राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हरले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपा युती निवडणूक हारले. हे देवेंद्र फडणवीसांना माहिती नाही. ते राजकारणातलं अत्यंत कच्चं मडकं आहेत. कॉपी करून पास झालेली पोरं असतातना, त्यांना डॉक्टरकी करता येत नाही. मग पेशंट मरतात टेबलावरच. त्या प्रकारचे फडणवीस आहेत."
तसेच, "नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. त्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हारलो. हे फडवीसांना माहीत नसेल,”, असेही राऊत यांनी म्हटले होते.