मुंबई : उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक स्वत:ला काय समजतात? तापडे आणि लाड नावाचे निरीक्षक यांच्यात एवढी मस्ती येते कुठून? हे अधिकारी लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत, यांच्यावर काय कारवाई करणार? असा खडा सवाल करत भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांना घरचा अहेर दिला. अधिकारी दोषी असतील तर त्याची चौकशी आपणच आपल्या स्तरावर करू असे म्हणत बुधवारी मंत्र्यांनी पुन्हा आवडीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले.‘राज्य उत्पादन शुल्कमंत्र्यांना ठरावीक अधिकारी आवडीचे’ असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर विधानपरिषदेत प्रलंबित राहिलेली लक्षवेधी चर्चेला आली. त्यावेळी दरेकर यांनी तीव्र शब्दात शिंदे गटाचे मंत्री देसाई यांच्या विभागावर टीका केली. दरेकर म्हणाले, मी स्वत: त्या अधिकाऱ्यांशी बोललो. एखाद्याकडे अधिकृत लायसन्स असेल तर त्यांनाही नाडण्याचे काम हे अधिकारी करतात. या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि त्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणीही दरेकर यांनी केली.
नऊ नऊ वर्षे एका ठिकाणी राहून, खाऊनही या अधिकाऱ्यांचे पोट भरले नाही का? पाटील या अधिकाऱ्याला १२ वर्षे झाली आहेत. हा माणूस सरकारच्या लोकांबद्दल अद्वातद्वा बोलतो. आम्ही कुणाला विचारत नाही, आम्ही बघून घेऊ, आम्ही सगळ्यांची व्यवस्था केली आहे असे बोलतात. पाटील, लाड, देशमुख, तापडे बेमुर्वत अधिकारी आहेत.
कोकण विभागातच यांचे विनंती अर्ज कसे येतात? यात मोठा भ्रष्टाचार असून पैशाची उलथापालथ झाल्याचे समोर येत आहे. सरकारचा हेतू शुद्ध आहे तर कालावधी पूर्ण झालेल्यांची सरकार बदली करणार का? असा थेट सवाल आ. भाई जगताप यांनी केला.
मंत्री शंभूराज देसाई अधिकाऱ्यांची वकिली का करीत आहेत. हे चार अधिकारी सरकारचे जावई आहेत का? नऊ वर्षे एकाच जागी काम करूनही त्यांची बदली का होत नाही. हाच न्याय बाकीच्यांना लावणार का? मंत्री त्या अधिकाऱ्यांची एवढी बाजू का मांडताहेत हेच कळत नाही.- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
ज्या नावांचा उल्लेख भाई जगताप यांनी केला त्या अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख लक्षवेधीत नाही. कोणालाही पाठीशी घातलेले नाही. जी चार-पाच नावे सांगण्यात आली त्याबाबत तपासून योग्य तो विचार करू. ते जी नावे देतील त्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी मी वैयक्तिकरीत्या करेन. जर काही आढळून आले तर कारवाई करू. चौकशी न करता बदली करणे हा त्यांच्यावर अन्याय होईल. माझ्याकडे नावे द्या, मी स्वत: चौकशी करीन.- शंभुराज देसाई, उत्पादन शुल्कमंत्री
सेवा २४ वर्षे आणि गेली २० वर्षे काही अधिकारी कार्यकारी पदावर आहेत. मंत्रिमहोदयांनी नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी डावलून बदल्या केल्या आहेत. मुंबईबाहेरील लोकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून पुन्हा मुंबईत करण्यात आल्या आहेत. या नियमबाह्य बदल्या रद्द करून या संपूर्ण बदल्यांची चौकशी करणार आहात का? कारण यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे.- एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे नेते
मंत्री देसाई ठाण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष अभय असेल. म्हणूनच ते अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असावेत, असेही विधानभवनात काही आमदारांनी बोलून दाखवले.