Maharashtra Politics: भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. याचा राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याचे समोर आले आहे. यावर भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
खरे म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा शब्द चुकला असेल, तरी त्यांच्या वाक्यातील आशय घेतला पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे की, पूर्ण वाक्याचा आशय न दाखवता, केवळ चुकीचा शब्द दाखवणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जी लोकं अशाप्रकारचे कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांनी आधी ते वाक्य नीट ऐकले पाहिजे आणि त्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितला चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा खरा अर्थ!
चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले आहे, जो शब्द खटकणारा आहे, त्याबद्दल त्यांनी खुलासा केलाय आणि माफीदेखील मागितली आहे. त्यानंतरही त्यांना टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य एवढेच होते की, आज लोकं अनुदानाच्या मागे लागतात. पण त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी जनतेतून पैसा उभा करुन शिक्षणाची व्यवस्था उभी केली. हा आशय महत्त्वाचा घेतला पाहिजे. अशा पद्धतीने टार्गेट करणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. शाई फेकणाऱ्याचे मनोज गरबडे असे नाव आहे. तो समता सैनिक दलासाठी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरात परिचित आहे. मनोज सोबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन जणांची चौकशी पोलीस चौकशी सुरू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"