मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पाटण्यात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात देशातील प्रादेशिक पक्षांबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले असून, देशभरातून भाजपवर टीका होत आहे. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नड्डांवर घणाघाती आरोप केले आहेत. दरम्यान, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नड्डांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
'उद्धव ठाकरेंची शिवसेना...'माध्यामांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना झालेली ईडीची अटक आणि जेपी नड्डांच्या वक्तव्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, 'महाराष्ट्रात शिवसेना संपुष्टात येतेय, असे नड्डा म्हणाले नव्हते. त्यांनी कुठेही अशाप्रकारचे वक्तव्य केले नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढला जातोय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जी शिवसेना होती ती राहिलेली नाही, असे नड्डा यांना म्हणायचे होते,' असे फडणवीस म्हणाले.
'आता एकनाथ शिंदेंची शिवसेना'फडणवीस पुढे म्हणाले की, 'आता जी नवीन शिवसेना तयार झाली आहे, ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तयार झालेली आहे. नड्डा ज्या शिवसेनेबद्दल बोलले, ती उद्धव ठाकरेंची, एकनाथ शिंदेंची नाही. कृपया लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका,' असे आवाहन यावेळी फडणवीसांनी केले. तसेच, संजय राऊतांच्या कारवाईवर बोलताना, 'कोणतीही एजन्सी कारवाई करताना, त्यांच्याकडे जे पुरावे असतात त्या आधारे करतात. त्या संदर्भात कोर्ट योग्य ती कारवाई करेल,' अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
जेपी नड्डा काय म्हणाले होते?बिहारची राजधानी पाटणा येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात खासदार आणि आमदारांची बैठकही पार पडली. कार्यक्रमाच्या समारोपाला अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी भाजपच्या नेत्यांना संबोधित केले. यावेळी भविष्यात देशात एकही असा पक्ष उरायला नको, जो भाजपच्या विरुद्ध लढेल. सर्व राजकीय पक्ष संपून जातील, फक्त भाजपा उरेल, असं वक्तव्य जे पी नड्डा यांनी केल होते.