"मुख्यमंत्र्यांचं मौन चिंताजनक; ते बोलत नसतील, तर राज्यपालांनी बोलत करावं!"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 02:10 PM2021-03-24T14:10:20+5:302021-03-24T14:15:24+5:30
आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यानंतर फडणवीस म्हणाले, महाविकासआघाडीने संपूर्ण नैतिकता पायदळी तुडवली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या घटना समोर येत आहेत. त्या अत्यंत चिंताजनक आहेत आणि त्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मौन तर अधिकच चिंताजनक आहे. मात्र, या घटनांवर ते बोलत नसतील, तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला. (BJP leader Devendra Fadnavis comment on thackeray government after governor Bhagat Singh koshyari meet)
आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यानंतर फडणवीस म्हणाले, महाविकासआघाडीने संपूर्ण नैतिकता पायदळी तुडवली आहे. केवळ सत्तेसाठीच हे सर्व सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर हल्ला चढवताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या. त्यात त्यांनी केवळ गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम केले. तर काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि राज्यात काही वेगळेच बोलतात. त्यांची काहीही भूमिका नाही. तसेच, आम्ही राज्यपालांना वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट
सरकार वाचविण्यासाठी हे सर्व सरू -
मुख्यमंत्री हे प्रमुख आहेत. या विषयांवर त्यांनी बोलायला हवे. मात्र, त्यांना माहीत आहे, की या मुद्द्यांवर बोलणे अवघड आहे. यावर बोलले तर याची चौकशी करावी लागेल. त्याची चौकशी त्यांना करायची नाही. सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व सुरु आहे.
लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब हे लवकरच समजेल -
फडणवीस म्हणाले, दिल्लीत काल जाऊन जो अहवाल दिला, तो लवंगी फटका होता की, मोठा बॉम्ब होता, हे लवकरच समोर येईल. तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? 25 ऑगस्ट 2020 पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमके कोण यात लिप्त आहेत, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
संजय राऊत मोठे नेते नाहीत -
फडणवीस म्हणाले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत अधिकृत व्यक्ती नाहीत. ते काही सरकारी व्यक्ती नाहीत. त्यांचे वक्तव्य सरकारचे अधिकृत मानले जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अहवालात सरकारबद्दल काहीही चुकीचे नाही. आपण तो अहवाल वाचावा. या कागदाची काय दखल घ्यायची ते मुख्यमंत्री ठरवतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे काही कागदपत्रे दिली त्यात काडीचाही दम नाही. विरोधी पक्षनेते म्हणे काही बॉम्ब वगैरे घेऊन आले होते. पण, तो बॉम्ब नसून भिजलेला लवंगी फटका आहे. या फटाक्याला वातसुद्ध नव्हती, आम्हीच दिल्लीत कुठे स्फोट झाला का, हे शोधत होतो, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अहवालाची खिल्ली उडवली होती.