नाशिक - राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यासंदर्भात, मुंडे यांनीही मंगळवारी (12 जानेवारी) फेसबुकवर संबंधित महिलेसोबतच्या आपल्या संबंधांची कबुली दिली. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिक येथे संघाचे जेष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: यासंदर्भात कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.” तसेच, “धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही त्या कबुलीसंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. यातील कायदेशीर बाब, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी या दोघांनीही मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे, असे संशयाचे वातावरण राहणे योग्य नाही. पोलिसांनी या संदर्भातील सत्य तत्काळ बाहेर आणावे. एकदा सत्य बाहेर आले की, आम्ही आमची मागणी करू”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांवर भाष्य - यावेळी फडणवीस यांनी भाजपला रामराम करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांवरही भाष्य केले. “जे दुसऱ्या पक्षात गेले त्यांचे वाईट वाटणार नाही. आणखीही काही नेते भाजपमध्ये येण्याच्या वाटेवर आहे”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील, असे वाटत नाही - चंद्रकांत पाटील यासंदर्भात, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्विट करत म्हटले आहे, की सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध केले होते, त्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती असं ते म्हणाले.
तसेच आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत, ज्या व्यक्तीवर अशाप्रकारे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो, मात्र गेंड्याचे कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेचा राजीनामा घेतील असं वाटत नाही, तरीही धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.