Maharashtra Politics: पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर भारत सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित आठ संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील प्रतोद कोडिकुन्निल सुरेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) बंदी घालण्याची मागणी केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कोडिकुन्निल सुरेश यांनी आरएसएसची पीएफआयशी तुलना करताना या दोन्ही संघटना सारख्याच असून, दोघांवरही बंदी घातली गेली पाहिजे, अशी मागणी केली. आम्ही आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करत आहोत. पीएफआयवर बंदी घालणे हा काही उपाय नाही. आरएसएससुद्धा संपूर्ण देशात हिंदू जातियवाद पसरवत आहे. आरएसएस आणि पीएफआय दोघेही सारखेच आहेत. त्यामुळे सरकारने दोघांवरही बंदी घातली पाहिजे. केवळ पीएफआयवर बंदी कशासाठी? अशी विचारणा सुरेश यांनी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
कुठल्याही संघटनेवर बंदी घालण्यासाठी पुरावे लागतात
असे मुर्खासारखे बोलणार लोक अनेक आहे. या देशात कायदा आणि संविधान अस्तित्वात आहे. कुठल्याही संघटनेवर बंदी घालण्यासाठी पुरावे लागतात. आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केरळमधील पूर्वीच्या काँग्रेस आणि कम्युनिस्ट सरकारांनीही केली होती. भाजपशासित किंवा इतर राज्यांमध्ये आरएसएसने पीएफआयप्रमाणे कृत्य केल्याचे ते शोधू शकले का, अशी विचारणाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी पीएफआयवरील तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन आरएसएसवर निशाणा साधला होता. “एक ही थाली के चट्टे-बट्टे” असे म्हणत सिंह यांनी आरएसएसची तुलना पीएफआयशी केली होती. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करत आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेवर कारवाई का करण्यात येत नाही, अशी विचारणाही सिंह यांनी केली होती.