मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेली MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, पुण्यात हजारो विद्यार्थी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. MPSC परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. कोणतीही पूर्वकल्पना न देता सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या परीक्षांवरून आता राजकारण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपने या निर्णयाविरोधात ठाकरे सरकारला घेरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही MPSC परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. (bjp leader devendra fadnavis demands that withdraw decision about mpsc exam postponed)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. यासंदर्भात फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. ''एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा'', अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वय निघून जाते, संधी हुकतात, या परीक्षा घेतल्याच पाहिजेत. सरकारचा निर्णय चुकीचा आहे, आता ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा आताच व्हायला हव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आपण एमपीएससीच्या परीक्षा अनंत काळासाठी पुढे ढकलू शकत नाही. काही परीक्षार्थींमुळे सर्व विद्यार्थ्यांना वेठीला धरणं चुकीचे आहे. आतापर्यंत या परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. समजा काही कारणांमुळे काहीजण परीक्षा देऊ शकले नाहीत. तर त्यांना पुढे संधी देता येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
"हे सरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे!"; पुण्यात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट
राजकीय वातावरण तापले
अधिवेशन आणि लग्न होतात मग MPSC परीक्षा का नाही, अशी विचारणा करत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी परीक्षेच्या मुद्द्यावर आपली भूमिका व्यक्त केली आहे. तसेच MPSC ची परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यांसह चंद्रकांत पाटील, विजय वड्डेटीवार, नितेश राणे यांसह अनेक नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुण्यात सुरू झालेला विद्यार्थ्यांच्या विरोधाचे पडसाद राज्यभर उमटल्याचे पाहायला मिळत असून, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, सांगली, यवतमाळ, हिंगोली, अकोला, वाशिम यांसारख्या अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळाली आहे.