मुंबई: भाजपा सरकारचा कारभार पारदर्शकच होता. त्यामुळे आम्हाला चौकशांच्या धमक्या द्यायच्या नाहीत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आकसबुद्धीनं काम करत आहे. मात्र आम्ही पारदर्शक कारभार केल्यानं आम्हाला त्याची चिंता वाटत नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्यावर पलटवार केला. फडणवीस यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार लवकरच बाहेर काढणार असल्याचं चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आम्ही पाच वर्ष अतिशय स्वच्छ कारभार केला आहे. त्यामुळे आम्हाला चौकशीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. आम्ही त्या मान्य करत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'भाजपा सरकारचा, आमच्या मंत्र्यांचा कारभार जनतेनं पाहिला आहे. सध्याचं सरकार सूडबुद्धीनं कारभार करत आहे. मात्र आम्ही पारदर्शक कारभार केल्यानं कोणतीही चिंता वाटत नाही,' अशा शब्दांत फडणवीसांनी चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी फडणवीस सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला होता. गेल्या ५ वर्षांतला भाजपा सरकारचा कारभार राज्यानं पाहिला आहे. त्यांच्या काळात अगदी राजरोजपणे भ्रष्टाचार सुरू होता. फडणवीस सरकार आतापर्यंतचं सर्वात भ्रष्ट सरकार होतं. त्यांच्या काळातली एक एक प्रकरणं आता आम्ही बाहेर काढू, असं चव्हाण यांनी म्हटलं होतं.
आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांवर फडणवीसांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 4:39 PM