मुंबई: मी चारवेळा मुख्यमंत्री झालो. पण मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर मला कधीच मी अजूनही मुख्यमंत्री आहे असं वाटलं नाही. देवेंद्र फडणवीसांना अजूनही तसं वाटत असेल तर चांगलंच आहे. मी पुन्हा येईनची वेदना किती खोल आहे, हे त्यातून दिसतं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काल फडणवीसांना लगावला. त्यानंतर आता फडणवीसांनी पवारांना टोला लगावला आहे.
शरद पवार साहेब खूप मोठे नेते आहेत. मोठ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं द्यायची नसतात. पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले. पण त्यांना कधीच पंतप्रधानपद मिळालं नाही याची वेदना त्यांच्या मनात असेल, असंही आपण म्हणू शकतो, अशा शब्दांत फडणवीसांनी पवारांना चिमटा काढला. राज्यात आम्हाला सत्ता मिळाली नाही ही गोष्ट खरी आहे. पण त्यामुळे आम्ही हातपाय गाळले नाहीत. विरोधी पक्ष म्हणून आमची कामगिरी उत्तम आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला आहे. पूर, वादळात आम्ही राज्यभर फिरलो. कोविड काळात लोकांची सेवा केली. घरात बसून राहिलो नाही, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे सणसणीत टोला लगावला.
राज्यातील सध्याची परिस्थिती वाईट आहे. ज्या वेगानं भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येत आहेत, तसं याआधी कधीच घडलेलं नाही. हजारो कोटी रुपयांची दलाली सुरू आहे. त्या दलालीचे पुरावे सापडत आहेत. प्रत्येक पक्षात मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहेत. त्यानुसारच त्यांचं कामकाज सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नाहीत. लखीमपूरमधील शेतकऱ्यांबद्दल सरकारला कळवळा वाटतो. पण राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय, अशी टीका फडणवीसांनी केली.
गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या अतिशय आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. सोमय्या पुराव्यांसोबत बोलतात. त्याशिवाय ते आरोप करत नाहीत. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता १०० टक्के आहे. आरोप असलेल्या मंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत, असं फडणवीस म्हणाले. सोमय्यांनी काही वर्षांपूर्वी ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, तेच नेते आज भाजपमध्ये आहेत, त्याचं काय?, असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर विरोधकांनी याबद्दल पाठपुरावा करावा. त्यांच्या अंगावर शेकलंय म्हणून उगाच दुसऱ्यांचे विषय काढू नयेत, असा सल्ला फडणवीसांनी दिला.