Devendra Fadnavis On Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. राहुल गांधी यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्षावरून मोदी सरकारवर टीका केली. या टीकेला भाजप नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे. याशिवाय बिलावल भुट्टो यांनी केलेल्या विधानावरूनही भाजप आक्रमक झाली आहे. या दोन्ही मुद्द्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
सरकार चीनच्या मुद्द्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि लपवताही येत नाही. चीनची कारवाई सुरू आहे. चीन घुसखोरीच्या नाही, युद्धाच्या तयारीत आहेत. भारत सरकार झोपले आहे. मी त्यांना या संदर्भात तीन-चार वेळा बोललो. परराष्ट्र मंत्र्यांनी आपली समज वाढवली पाहिजे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.
चीनवरून काही बोलायचा अधिकारच राहुल गांधींना नाही
मी राहुल गांधींना आठवण करून देतो की, भारताचा भूभाग चीनला जेव्हा जेव्हा दिला, त्या त्या वेळेस त्यांच्या परिवारातील लोक देशाचे नेतृत्व करत होते. ते पंतप्रधान होते. भारताचा भूभाग गेल्यानंतर तुम्ही काहीही करू शकला नाहीत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात डोकलाममध्ये चीनला आपण रोखले. त्यानंतर सातत्याने आपण चीनला रोखले. भारताची एक इंचही जागा चीनला घेऊ दिली नाही. याउलट, चीनने एक स्टेटमेंट काढलेय की, भारताने आमच्या हद्दीत येऊन अतिक्रमण केले. हे म्हणायची वेळ आज चीनवर आली आहे. चीनवरून काही बोलायचा अधिकारच राहुल गांधींना नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात? याचंच आश्चर्य
मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, बिलावल भुट्टो आणि राहुल गांधी एकाच दिवशी कसे बोलतात. राष्ट्राच्या प्रति तुमच्या संवेदना काय आहेत, हे यातून लक्षात येते. बिलावल भुट्टो हे एका अयशस्वी देशाचे मंत्री आहेत. त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. एका दहशवादी देशाचे मंत्री असून, जगाने त्यांना दहशतवादी ठरवलेले आहे. त्यांच्या बोलण्याचा काहीही महत्त्व नाही. परंतु, देशाच्या पंतप्रधानांबद्दल असे विधान केल्यावर देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देशहित लक्षात घेऊन त्यांविरोधात आवाज उठवायला हवा होता. पण त्यांनी तसे केले नाही. हे अतिशय चुकीचे आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय मंचावर भारताविरोधात प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल जरदारी भुत्तो सातत्याने भारतावर टीका करत आहेत. न्यूयॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत बिलावल भुत्तो यांनी सर्व मर्यादा पार करत मुक्ताफळे उधळली. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी अमेरिकेने त्यांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घातली होती. नरेंद्र मोदी आणि एस. जयशंकर हे भारताचे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादाला शेजारील देशाकडून प्रोत्साहन मिळत आहे. भारत सरकार गांधीजींच्या विचारसरणीवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्या हत्याऱ्यांच्या विचारांवर विश्वास ठेवते. भारत सरकारवर हिलटलरचा प्रभाव आहे, अशी मुक्ताफळे बिलावल भुत्तो यांनी उधळली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"