"आज मला 'त्या'चा पश्चाताप, 'ते' नसते केले तर बरे झाले असते"; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 08:50 AM2021-11-30T08:50:33+5:302021-11-30T08:51:15+5:30
फडणवीस म्हणाले की, ते एक पुस्तक लिहीत आहेत, ते त्यात सर्व घटनांचा उहापोह करणार आहेत. एवढेच नाही तर महाराष्ट्रात सध्या "केवळ सरकार आहे, शासन नाही," असेही ते म्हणाले.
मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे. "मी यापूर्वीदेखील बोललो आहे, आज मला त्याचा पश्चाताप आहे, की हे नसते केले तर बरे झाले असते. आपण लढलो असतो." एवढेच नाही, तर "आता बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली, काय काय केली. हे मात्र, माझ्या पुस्तकात कळेल. त्याची वाट बघा...," असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस? -
'मुंबई तक' या यूट्यूब चॅनलवर बोलताना फडणवीस म्हणाले, "अजित पवारांसोबत आम्ही जे सरकार तयार केले होते, ते एका वेगळ्या भावनेतून तयार केले होते. कारण आमच्यासोबत विश्वास घात झाला होता आणि दोन्हीकडून झाला होता. त्या विश्वास घातानंतर आम्हाला वाटले, की आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय. तर राजकारणात जिवंत रहायला पाहिजे, जशास तसे उत्तर दिले पाहिजे. म्हणून ते केले.
बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली? माझ्या पुस्तकात कळेलच -
आज तुम्ही मला विचाराल तर, मी यापूर्वीदेखील बोललो आहे, आज मला त्याचा पश्चाताप आहे, की हे नसते केले तर बरे झाले असते. आपण लढलो असतो. पण त्यावेळी असे वाटत होते की, काय असते ना, एक खुन्नस असते, आपल्याला एवढा धोका दिला? एवढी आपल्यासोबत बेइमानी झाली? चला दाखवून देऊ. त्या भावनेतून ते केले. ठीक आहे आता तो विषय संपला. आता बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली, काय काय केली. हे मात्र, माझ्या पुस्तकात कळेल. त्याची वाट बघा..."
सध्या राज्यात केवळ सरकार, शासन नाही -
फडणवीस म्हणाले की, ते एक पुस्तक लिहीत आहेत, ते त्यात सर्व घटनांचा उहापोह करणार आहेत. एवढेच नाही तर महाराष्ट्रात सध्या "केवळ सरकार आहे, शासन नाही," असेही ते म्हणाले.
राज्य सरकारने 10000 कोविड मृत्यू लपवले -
यावेळी फडणवीस यांनी, महाराष्ट्रात कोरोनाला चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल, उद्धव सरकारेंवर जोरदार हल्ला चढवला. "राज्य सरकारने 10000 कोरोना मृत्यू लपवले. कोरोनाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळल्याबद्दल सरकार स्वतःची पाठ थोपटून घेते. पण देशातील एकूण कोविड मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातच झाले आहेत, हे वास्तव ते का स्वीकारत नाहीत?" असा सवालही त्यांनी यावेळी केला.