शुक्रवारी पार पडलेल्या दसरा मेळाव्यादरम्यान (Dasara Melava 2021) उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आणि शिवसैनिकच मुख्यमंत्री बनेल याचा पुनरूच्चार केला. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का पडावं लागलं? असा सवाल केला. नागपूरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
"दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत, आता मुखवटा काढा आणि मान्य करा तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती. राजकारणात महत्त्वाकांक्षा चुकीची नाही. परंतु त्याच्या मागे खोटं सांगणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं नव्हतं आणि तुम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं तर तुमच्याकडे रावते, देसाई यांच्यासारखे नेते होते, त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही. जर मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर राणेंना का पक्षाच्या बाहेर जांवं लागलं. राज ठाकरेंना बाहेर का जावं लागलं. त्यांना पक्षावर कब्जा करायचा नव्हता. या सर्व गोष्टी बोलणं बंद केलं पाहिजे," असं फडणवीस यावेळी म्हणाले.
सरकार पडेल हे कळणारही नाहीसरकार पाडून दाखवा हे रोज म्हणतात. ज्या दिवशी सरकार पडेल ते कळणारही नाही. आम्हाला सध्या त्यात रसही नाही. कामं करून दाखवा, शेतकऱ्यांची मदत करा. तुमच्याकडे सत्ता आहे मदत करून दाखवा, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. काल मुख्यमंत्री जे बोलले त्यावरून त्यांचं फ्रस्ट्रेशन दिसून येतं. जनतेनं भाजपला नाकारलं नाही. काँग्रेस शिवसेनेला नाकारलं आणि शिवसेनेला पासिंग मार्क्स दिले. जनतेसोबत बेईमानी करत सरकार स्थापन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.