युती केली नसती तर सत्तेत आलो असतो; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 09:13 PM2019-12-13T21:13:40+5:302019-12-13T21:15:30+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व पक्षांच्या कामगिरीची तुलना
मुंबई: आम्ही शिवसेनेसोबत विधानसभा निवडणूक लढलो. एकत्र प्रचारसभा घेतल्या. जनतेनं आम्हाला कौलदेखील दिला. मात्र शिवसेना थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यानं राज्यात महायुतीचं सरकार येऊ शकलं नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं. निवडणूक निकालाच्या दिवसापासूनच शिवसेनेनं भाजपाला लांब ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे शिवसेनेसोबत युती केली नसती, तर सत्तेत आलो असतो, असं आता आम्हाला वाटू लागल्याचंदेखील फडणवीस यांनी सांगितलं.
आम्ही शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढवली. त्याचवेळी विधानसभेसाठीदेखील युती करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडी उलगडून सांगितल्या. लोकसभेत सोबत लढलो आणि विधानसभेसाठी वेगळे झालो, हे योग्य वाटणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकही शिवसेनेत सोबत लढा असा संदेश आम्हाला दिल्लीतून आला होता. त्यानुसार आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि जनतेनंदेखील आम्हाला कौल दिला. मात्र शिवसेनेनं जनादेशाचा विश्वासघात केला, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी 'एबीपी माझा' दिलेल्या मुलाखतीत केली.
आम्ही २०१४ मध्ये १२३ जागा जिंकलो होतो. त्या तुलनेत यंदा आमच्या जागा कमी झाल्या. आम्हाला १०५ जागांवर यश मिळालं. मात्र आम्ही यावेळी १६४ जागाच लढवल्या होत्या हे लक्षात घ्या, असं म्हणत फडणवीसांनी इतर पक्षांनी जिंकलेल्या जागांची तुलना केली. आम्ही जितक्या जागा लढवल्या, त्यापैकी ६७ ते ७० टक्के जागा जिंकल्या. सध्या सत्तेत असलेल्या पक्षांचा स्ट्राईक रेट आमच्यापेक्षा खूप कमी आहे. त्यांनी फक्त बहुमताचं गणित जुळवलं आहे. त्यामुळे ते सत्तेत आहेत. राज्याची पहिली पसंती भाजपाला होती. त्यामुळे आमचा पराभव झाला आहे असं मी मानत नाही. सध्याची परिस्थिती पाहता, स्वबळावर निवडणूक लढवली असती तर सत्तेत आलो असतो असं वाटतं, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीचं आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींवर भाष्य केलं.