मुंबई :सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणी पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. तसेच रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवलावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच रंगले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. वाझे यांचे मालक अस्वस्थ आणि चिंतेत आहेत, असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी साधला आहे. (bjp leader devendra slams thackeray govt over sachin vaze case and phone tapping issue)
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. सचिन वाझे प्रकरणामुळे राज्याची सर्वाधिक बदनामी झाली. पोलिसांच्या बदलीमध्ये झालेल्या गैरव्यवहार आणि सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली की कौतुक झाले, असा सवाल करत म्हणून सचिन वाझे यांचे मालक चिंतेत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
अनेकांचे बिंग फुटणार
महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे. त्यामुळे अनेक लोकांचे बिंग फुटणार आहे. खरंतर हा रिपोर्ट नवाब मलिक यांनींच फोडला. मी पहिली दोन पानंच दिली होती. नवाब मलिक व त्यांचे सर्व सहकारी घाबरलेले आहेत, की वाझे आता काय काय बोलतील? जेवढे वाझेचे मालक आहेत ते सर्वच्या सर्व घाबरलेले आहेत की, आता कोणत्या कोणत्या गोष्टी बाहेर येतील? कारण की ज्या प्रकारे गोष्टी समोर येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का; रोहित पवारांचा सवाल
राज्यात सिंडेकेट राज सुरू
राज्यात एकप्रकारे सिंडेकेट राज सुरू होते. मुंबई व महाराष्ट्र पोलिसांची बदनामी आम्ही केले नाही. हे सिंडिकेट राज चालवले, ज्यांनी १७ वर्षांनंतर वाझेला नियमाबाहेर असतानाही महत्वाचे पद दिले आणि ज्यांनी सर्वच्या सर्व केसेस वाझेकडे दिली व मुंबई पोलीस ज्यांचे नाव स्कॉटलॅण्ड यार्ड पोलिसांपेक्षाही चांगले होते, त्याला बदनाम करण्याचे काम केले, आता तेच प्रश्न विचारत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
सावंतांना मी काय उत्तर देणार
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजते तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. असे रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली.
दरम्यान, पोलिसांच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर कुणीही गायब केली तरी त्याचा बॅकअप मेन सर्व्हरला आहे. प्रायव्हेट डीव्हीआर नष्ट करणे सोपे आहे. पण पोलिसांचा डीव्हीआर गायब करणे सोपे नाही. त्यामुळे त्याचे पुरावे मिटणार नाहीत. तशी व्यवस्थाच करून ठेवली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.