मुंबई: विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं नाराज झालेल्या एकनाथ खडसेंनी पक्षावर जोरदार टीका केली आहे. या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. यानंतर खडसेंनी पुन्हा पाटील यांच्यावर तोफ डागली. चंद्रकांतदादा विद्यार्थी परिषदेमधून पक्षात आले. त्यांना पक्षाचा इतिहास माहीत नाही. पक्षाच्या जडणघडणीत त्यांचं योगदान शून्य असल्याचं खडसे म्हणाले.विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर खडसेंनी भाजपावर शरसंधान साधलं. निष्ठावंतांना तिकीटं नाकारली जातात आणि बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी देण्यात येते, असा आरोप खडसेंनी केला. त्यावर खडसेंना आतापर्यंत खूप काही दिलं, असा विचार करून केंद्रीय नेतृत्त्वानं त्यांना तिकीट नाकारलं असावं, अस पाटील म्हणाले. आयुष्यभर खस्ता खाऊन इतरांना मोठं करण्याची आमची संस्कृती असल्याचं पाटील यांनी सांगितलं. वसंतराव भागवत यांना पक्षाकडून काहीच मिळालं नाही. मुंडे, महाजन त्यांना गुरू मानायचे. भागवत यांनी नेते घडवले, असं पाटील यांनी सांगितलं.एकनाथ खडसेंवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबाला मिळालेल्या सगळ्या पदांची यादीच वाचून दाखवली. 'खडसे सातवेळा आमदार झाले. दोनवेळा त्यांना मंत्रिपद मिळालं. त्यांच्या सुनेला दोनदा खासदारकी मिळाली. मुलीला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं. खडसे यांच्या पत्नीला महानंदाचं अध्यक्षपद देण्यात आलं,' असं पाटील यांनी सांगितलं. पाठीत खंजीर खुपसल्याची भावना खडसेंनी व्यक्त केली होती. त्यावरुनही पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. 'भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळानं हरिभाऊ जावळे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं होतं. मात्र ते तिकीट कापून खडसेंच्या सुनेला उमेदवारी देण्यात आली. तेव्हा खडसेंनी जावळेंच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? जग्वानी यांना देण्यात आलेलं विधान परिषदेचं तिकीट कापून खडसेंनी मुलाला उमेदवारी दिली. तेव्हा तुम्ही जग्वानी यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का?', असे प्रश्न पाटील यांनी विचारले. खडसे कुटुंबाला पक्षानं खूप काही दिलं, या पाटील यांच्या विधानाचा एकनाथ खडसेंनी समाचार घेतला. आम्ही जे काही मिळवलं, ते स्वत:च्या हिमतीवर मिळवलं. ज्यावेळी कुणीही पक्षात यायला तयार नव्हतं, उमेदवारी घेत नव्हतं, त्या काळात मी निवडून येत होतो. मी आतापर्यंत एकाही निवडणुकीत पराभूत झालेलो नाही. आता पक्षात सक्रीय झालेल्यांना पाटील यांना हा इतिहास माहीत नाही, अशा शब्दांत खडसेंनी पाटील यांचा समाचार घेतला.
खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली; दोघांनी मोठीच्या मोठी यादीच वाचली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 3:18 PM