विधान परिषदेच्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या या भूमिकेनंतर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे.
एकनाथ खडसे एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, विधान परिषदेसाठी माझे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव दिल्लीला शिफारस करून पाठवण्यात आले आहे असे मला सांगण्यात आले होते. मात्र आता आमच्या तिघांऐवजी नवीन माणसांना संधी देण्यात आली.
पक्षाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर माझं नाव या यादीत नसल्याचे समजले. यानंतर भाजपाच्या असंख्य कार्यकर्ते आणि नेत्यांचे मला फोन येत आहेत. भाजपामध्ये राहण्याबाबत काहीतरी निर्णय घ्या, असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. वारंवार अन्याय होत आहे, वारंवार तुम्हाला बाजूला सारलं जातंय. त्यामुळे याचा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असा अनेक कार्यकर्त्यांचा दबाव आहे, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे इतर पक्षांकडूनही मला ऑफर येत आहे. मात्र कोरोनाच्या संकटकाळात कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही, पण कोरोनाच्या संकटानंतर आपण राजकीय निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट संकेत एकनाथ खडसेंनी दिले आहेत.
मी चाळीस-बेचाळीस वर्षे भाजपामध्ये काम करत आहे. यावेळी विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती मिळू शकली नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्यांना संधी मिळाली असती तर मला आनंद झाला असता असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.