"राष्ट्रवादीसोबत झालेली युती दुर्दैवी";BJP नेत्याच्या विधानावर अजितदादा म्हणाले, "असं बोलत बसलात तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 01:20 PM2024-08-31T13:20:16+5:302024-08-31T13:23:06+5:30

महायुतीतील नेते ऐकमेकांवर टीका करत असताना भाजप नेत्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली युती ही दुर्देवी असल्याचे म्हटलं आहे.

BJP leader Ganesh Hake termed alliance with the Ajit Pawar Nationalist Congress Party as unfortunate | "राष्ट्रवादीसोबत झालेली युती दुर्दैवी";BJP नेत्याच्या विधानावर अजितदादा म्हणाले, "असं बोलत बसलात तर..."

"राष्ट्रवादीसोबत झालेली युती दुर्दैवी";BJP नेत्याच्या विधानावर अजितदादा म्हणाले, "असं बोलत बसलात तर..."

Ajit Pawar on BJP Ganesh Hake : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सत्ताधारी महायतीमधील धुसफूस वारंवार समोर येत आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील नेते अजित पवार यांना सातत्याने टार्गेट करताना दिसत आहेत. मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचया प्रवक्त्यांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्याबाबत भाष्य केलं आहे.

मंत्री तानाजी सावंत यांनी नुकतेच राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसलो तरी मला उलटी येते असं विधान केलं होतं. सावंत यांच्या या विधानावरुन महायुतीत ठिणगी पडल्याचे म्हटलं जात होतं. अशातच आता भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनीही अजित पवार यांच्याबाबत धक्कादायक विधान केलं आहे. अजित पवारांबरोबरची युती म्हणजे असंगाशी संग असं गणेश हाके यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी गणेश हाकेंच्या बोलण्यात काही अर्थ नाही असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

"अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे अहमदपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते म्हणतात आपली युती आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का?  अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्दैवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगशी संग म्हणतात असा संग घडला आहे. पैसे आमचे घेऊन काँग्रेसच्या पेंडलमध्ये तुमचे कार्यकर्ते नेते नगरसेवक बसत होते. महायुतीचा धर्म एकट्याने आम्हीच पाळायचा का?," असा सवाल भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी केला. 

गणेश हाके यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी हाकेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "माझं बोलणं पंतप्रधान मोदी, केंद्रीय  अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाले आहे. तुम्ही जर असे बोलत बसलात तर माझे कार्यकर्तेदेखील प्रतिक्रिया देत राहतील. हाकेंच्या बोलण्याला काही अर्थ नाही. माझं माझं काम सुरु आहे. या उत्तरांना मी महत्व देत नाही," असं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

दरम्यान, धाराशिव येथील एका कार्यक्रमात बोलताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर बोचरी टीका केली होती. “मी हाडामासांचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही,” असं मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं.

Web Title: BJP leader Ganesh Hake termed alliance with the Ajit Pawar Nationalist Congress Party as unfortunate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.