जळगाव: देशासह राज्यात आताच्या घडीला राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. अनेक नेते राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराज असल्याचे चित्र आहे. तर, राज्यसभा निवडणुकीत भाजप घोडेबाजार करू शकतो, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यावर भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात असून, नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. भविष्यात शिवसेनेची अवस्था काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षाही बिकट होईल, असा दावा गिरीश महाजन यांनी यावेळी केला आहे.
शिवसेनेने शॉर्ट टर्म विचार करून मुख्यमंत्रीपद मिळवले. मात्र, यावेळी त्यांनी दीर्घकालीन राजकीय समीकरणांचा विचार केलेला नाही. शिवसेनेची जनमानसातील प्रतिम दिवसेंदिवस घसरत आहे. शिवसेना सतत किरीट सोमय्या, राणा कुटुंबीय आणि ईडी याच विषयांवर बोलत असते. या सगळ्यामुळे भविष्यात शिवसेनेची अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षाही वाईट होईल, या शब्दांत गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपचाच विजय होईल
भाजपने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. राज्यसभेची तिसरी जागा आम्ही हमखास जिंकणार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही घोडेबाजार करणार नाही. भाजपने बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली, असे संजय राऊत म्हणतात. पण आमच्याकडे बोट दाखवताना हाताची इतर चार बोटे तुमच्याकडे आहेत, हे लक्षात असू द्या. यापूर्वी शिवसेनेने राजकुमार धूत, प्रितीश नंदी, संजय निरूपम आणि प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली होती. हे कोणते निष्ठावंत शिवसैनिक होते, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेचाही गिरीश महाजन यांनी समाचार घेतला. संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहेत. दररोज सकाळी हा भोंगा वाजतो. ते कधीच राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या प्रश्नांविषयी बोलत नाहीत, असे महाजन यांनी म्हटले.