Exclusive: निष्ठावंत दिलीप गांधींचं तिकीट सुजय विखेंना देण्यामागे (महा)'जन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 02:54 PM2019-03-30T14:54:18+5:302019-03-30T14:56:17+5:30
गिरीश महाजनांनी सांगितलं विखेंच्या पक्षप्रवेशामागचं कारण
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते भाजपावासी होत आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांच्या मुलांचा भरणा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील तरुण नेते भाजपामध्ये जात असल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना मुलं पळवणारी टोळी म्हटलं होतं. याशिवाय निवडणूक जवळ आल्यानं भाजपामध्ये दाखल झालेल्यांना तिकीट मिळाल्यानं निष्ठावंत नाराज झाले. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये भाष्य करत पक्षाची बाजू मांडली.
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील, राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये दाखल झाले. सुजय यांना उमेदवारी दिल्यानं नगरचे खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापलं गेलं. त्यामुळे गांधी नाराज झाले. यावर भाष्य करताना जनतेचं ऐकूनच आम्ही निर्णय घेतल्याचा दावा महाजन यांनी केला. 'उमेदवारी देत असताना आम्ही लोकांच्या मतांचा विचार करतो. नगरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात गांधींविषयी नाराजी असल्याचं लक्षात आलं. तीन-तीन सर्वेक्षणांमधून हीच गोष्ट समोर आली. त्यातच सुजय यांना उमेदवारी हवी होती. मात्र तो मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्यानं त्यांना तिकीट मिळत नव्हतं. त्यामुळेच आम्ही त्यांना उमेदवारी दिली,' असं महाजन यांनी सांगितलं.
अनेकांना भाजपामध्ये येण्याची इच्छा आहे. लोकांचा भाजपामध्ये ओढा आहे, असं महाजन म्हणाले. 'अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यत भाजपाचा प्रभाव आहे. त्यामुळेच अनेकांना भाजपामध्ये येण्याची इच्छा आहे. निष्ठावंतांचं योगदान विसरता येणार नाही. त्यांच्यामुळेच पक्ष आज इथपर्यंत पोहोचला. पण अनेकदा पक्षाच्या विस्तारासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रवेश दिला जातो. पक्षाच्या वाढीसाठी काही चेहरे गरजेचे असतात,' अशा शब्दांमध्ये महाजन यांनी भाजपामधील वाढत्या इनकमिंगचं समर्थन केलं.