अहमदनगर - ४ वेळा मुख्यमंत्री होते, केंद्रात मंत्री होते तेव्हा शरद पवार यांना चौंडी दिसली नाही का? अहिल्यादेवींचं ठिकाण हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. तुमच्यात धमक असेल तर समोरासमोर सभा लावा. मग बघा असं आव्हान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना दिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे जन्मस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत आमदार रोहित पवार यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. परंतु जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी निघालेल्या गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी वाटेतच रोखल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. यावेळी पडळकर, खोत आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली.
यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, चौंडी ही शरद पवारांच्या बापाची जहागिरदारी नाही. हुकुमशाही नाही. पवार घराण्याच्या सातबारावर चौंडी नाही. अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी जाण्यापासून का रोखले गेले? या पवित्र ठिकाणी दर्शनासाठी प्रत्येकाला जाऊन द्यायला हवं होतं. महाराष्ट्रातील जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार गेल्याशिवाय दर्शनाला जायचं नाही तुम्ही औरंगजेबाची औलाद आहे का? अशी घणाघाती टीका केली
मी लहानपणापासून अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी येतो. परंतु अशारितीने आम्हाला कधी अडवण्यात आले नाही. चौंडीच्या जयंतीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीने राजकारण आणलं. अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी शरद पवार आणि पोलिसांच्या परवानगी आवश्यकता नाही. चौंडीत जाऊन आम्ही अहिल्यादेवींचे दर्शन घेणार. तेथील लोकांशी बोलणार मगच घरी परतणार अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे.
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत चौंडीला निघाले होते. परंतु पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले. यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते चांगले आक्रमक झाले. शरद पवारांच्याविरोधात घोषणाबाजी केली गेली. पोलीस बळाचा वापर करून अहिल्यादेवी जयंतीनिमित्त चुकीचं करत आहात. यातून महाराष्ट्राला काय संदेश द्यायचा आहे? असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
दरम्यान, तुमच्यात धमक असेल तर लोक तुमचं ऐकायला येतील. शरद पवार स्टंटबाजी करतात. अहिल्यादेवींच्या जयंतीला मी येणार नाही तर कोण येणार? शरद पवार, रोहित पवार यांचं चौंडीत राजकारण सुरू आहे. पोलीस प्रशासनाशी आम्ही चुकीच्या पद्धतीने वागलो नाही. शरद पवारांना इतक्या वर्षात जयंती दिसली नाही का? मल्हारराव होळकर यांनी मुघलांना माती चारली होती. पोलीस बळाचा गैरवापर करून तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. बहुजनाची पोरं आजोबा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.