ठळक मुद्दे दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदीचा सरकारचा निर्णयशुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावणार
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी’ असे धोरण अवलंबत कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. सोमवार (५ एप्रिल) रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहतील. शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला सर्वांचा पाठींबाही मिळाल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्या असं त्यांनी म्हटलं आहे. कठोर निर्बंधांच्या काळात कोणत्या आरोग्य सुविधांची उभारणी करणार?, रोज श्रम करून कमावणाऱ्यांच्या रोजगार, कमाईची व्यवस्था?, या काळात राज्यात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, वितरण यांविषयीचा कार्यक्रम निश्चित केला आहे का?, रुग्णांसाठी आवश्यक असलेली मदत केंद्रे व औषधे उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण केली आहे का? पैशाअभावी उपचारांविना कोणीही राहणार नाही याची हमी सरकार देईल का? असे सवाल उपाध्ये यांनी केले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला हे सवाल केले आहेत. आजपासून राज्यात निर्बंधयापुढे ‘मिशन बिगीन अगेन’ ऐवजी ‘ब्रेक दी चेन’ या नावाने ही नवी नियमावली लागू होईल. राज्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकांनी आरोग्याचे नियम न पाळता गर्दी केल्यास स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते. हे सुरू राहणार खासगी कार्यालयांनी पूर्णपणे ‘वर्क फ्रॉम होम’ करणे बंधनकारक. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू राहणार. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाइनद्वारे घ्याव्यात. सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस १००० रुपये आणि संबंधित दुकान किंवा संस्थेस दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू राहील. मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तूंची दुकाने. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे. तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे. सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरू ठेवण्यात येईल. मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे. बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत. तसेच प्रवाशांनी मास्क घातलेले असावे.