केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू झाली होती. यादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या. नारायण राणे यांनी दादर येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं होतं. यानंतर भाजपनं शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करण्याच्या कृत्याने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने झुकली असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करण्याच्या कृत्याने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे. या कृत्याबद्दल पुरोगामी विचारवंत मंडळींनी बाळगलेले मौन धक्कादायक असल्याचं उपाध्ये म्हणाले. वाशीम येथे भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या वाहनावर काळे फेकण्याच्या व दगडफेकीच्या प्रयत्नाचा त्यांनी तीव्र निषेध केला.
फडणवीसांकडूनही टीका"ज्या लोकांनी हे केलं असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे, एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, या शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कृतीवर निशाणा साधला. ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली असे सांगता. ही कृती अतिशय अयोग्य आहे, असंही त्यांनी नमूद केलं.