शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. देशाची हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखण्यासाठी, देश प्रथम हे उद्दिष्ट समोर ठेवून एकत्र येत आहोत, असे दोन्ही नेत्यांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंती दिनी जाहीर करण्यात आले. दरम्यान, या युतीवरून भाजपनं जोरदार निशाणा साधला आहे.
“प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित सोबत उद्धव ठाकरे यांच्या शिल्लकसेनेची युती म्हणजे.. वंचित सोबत किंचित,” असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या युतीवर टीकेचा बाण सोडला.
काय म्हटलेलं आंबेडकर यांनी?ईडीच्या माध्यमातून देशातले राजकीय नेतृत्व संपवण्याचा घाट घातला जातो आहे. मात्र, कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. नरेंद्र मोदींचाही एक दिवस पक्षात अंत होणार आहे. त्यांनीही पक्षातील नेतृत्व संपवल्याची टीका आंबेडकर यांनी केली.
वेळ आल्यावर जागा वाटपाचा निर्णय : उद्धव ठाकरेवंचित व शिवसेना जागा वाटपाच्या निर्णयाबाबत बोलताना अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. हिंमत असेल तर निवडणुका घ्याच, असे आव्हान देत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. वेळ आल्यावर कोणत्या जागा लढवायच्या तोही निर्णय घेऊ. दोघांची पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी काय करता येईल, या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल, असंही ते म्हणाले.