अखंड भारताबाबत सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. "येणाऱ्या २० ते २५ वर्षांत भारत अखंड भारत होईल. पण आपण थोडे प्रयत्न केले, तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांतच साकार होईल. याला रोखणारं कुणीही नाही. जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील. एवढेच नाही, तर सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे," असंही ते म्हणाले होते. यावर राऊत यांनी प्रत्युत्तर देत ते १५ वर्षांत नाही तर १५ दिवसांत करा असं म्हटलं होतं. यावरून भाजपनं आता राऊतांवर निशाणा साधलाय.
भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊत यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. "सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपण प्रयत्न केल्यास १०-१५ वर्षात अखंड भारताचं स्वप्न साकार होईल असं विधान केलं. त्यावर भाजपाची कावीळ झालेले संजय राऊत यांनी १५ वर्ष नव्हे तर १५ दिवसांत अखंड हिंदुस्तानचं स्वप्न साकार करू असं वचन द्या असं विधान केलं. अहो राऊतसाहेब, सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व सोडलेच आहे हे वारंवार सिद्ध का करताय?," असा सवाल उपाध्ये यांनी केला.